स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? 

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात. खालील निष्कर्ष हे मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चेतून निष्पन्न झालेले आहेत. मी त्यांची जबाबदारी घेत नाही. मी फक्त मांडण्याचं काम करते आहे.

(१) “पॉवरफुल” – आदिमानवाच्या काळात कदाचित शारीरीक सबळता हा निकष असेल पण आता आधुनिक युगामधे तो निकष तितक्या प्रिमिटीव्ह पातळीवर न राहता तो निकष देखील विकसीत झाला आहे . “आर्थिक”, “सामाजिक”, “बौद्धिक” दृष्ट्या सक्षम पुरुष हे स्त्रियांना चटकन अपील होतात (भावतात). नात्यामधे स्त्रीला सुरक्षेची भावना महत्वाची वाटते. जी सुरक्षा अर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रामधे स्थिर झालेली व्यक्ती परिपूर्ण रीतीने देऊ शकते. त्याचप्रमाणे नात्यामधील “कमीटमेंट” ही स्थैर्य लाभलेले पुरुषच देऊ शकतात. शेवटचा मुद्दा अशा रीतीने स्थैर्य लाभलेल्या पुरुषाचा सहवास प्रिय वाटणं कारण स्त्रीला स्वतःला स्थिरता लाभल्याने जणू सुर्यप्रकाश मिळालेल्या कमळासारखी ती विकसीत होणं.

(२) “मार्दवपूर्ण” – काही पुरुष अतिशय मार्दवपूर्ण वागणारे , बोलणारे, सौजन्यशील, सिव्हिलाइज्ड असतात. दुर्मीळ पण क्वचित सापडतात खरे. स्त्रियांना हे “नॉन्-थ्रेटनिंग” वाटतात. त्यांच्याबरोबर मन मोकळं करता येईल असं काहीसं वाटतं. हे पुरुष आवडण्यामागे शास्त्रीय कारण हेदेखील असू शकतं की मार्दव असल्याने मूल वाढविण्यास हा योग्य जोडीदार आहे असा “सबकॉन्शस” निर्णय मेंदू घेत असावा. शिवाय मित्र या रूपातदेखील हे पुरुष अगदी फिट बसतात.

(३) “बॅड बॉय” – हे पुरुष रुढार्थाने पारंपारीक नसतात तर थोडे बंडखोर, धोकादायकच असू शकतात्.त्यांच्यामध्ये गुंतण्यात एक प्रकारचा धोका असतो. पण या धोक्यातच थ्रिल असतं. परत आपण अशा पुरषाला बदलू शकू हा अटळ आत्मविश्वास .आपलं प्रेम या आडमार्गाला गेलेल्या पुरषाला पारंपारीक सज्जनतेच्या मार्गावर घेऊन येइल आणि आपला अहंकार सुखावेल अशी काहीशी मनोभूमिका यामागे असू शकते.


(४) “रोमँटीक” – कधीही पहीला वाढदिवस, पहीली भेट, पहीलं अमकंटमकं न विसरणारे हे पुरुष. फुलं देतील, चॉकलेटचा भडीमार करतील, भेटवस्तू, कवितांची पखरण करतील. भरपूर लाड आणि खूप लक्ष पुरवतील आपल्या प्रियेकडे. काही स्त्रियांना असे पुरुष का आवडतात हे ओळखणं फार अवघड नसावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *