छ. संभाजी महाराजांनी कर्नाटकच्या चिक्कदेवराजाची मस्ती कशी उतरवली होती 

मराठ्यांची जहागीर एंकोजीरावांनी बेंगलोरहून,तंजावरला हलविल्यापासून म्हैसूरकर चिक्कदेवराजा खूप माजला होता.त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते.रामसेजचा लढा चालू असल्यामुळे औरंगजेब नजीकच्या कालखंडात घाटमाथ्यावर उतरण्याची शक्यता कमी होती.त्यातच पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते.औरंगजेबबरोबरच्या निर्णायक युध्दात कर्नाटक,तामीळ प्रांतातून येणारी रसद महत्त्वाची ठरेल ही संभाजीराजेंनी ओळखले होते.कर्नाटक,तामीळ प्रांतातील जहागीर त्यासाठी शाबूत ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे संभाजीराजेंनी कर्नाटक,तामीळ प्रांतावरील मोहिमेचा बेत आखला.

चिक्कदेवराजाची ताकद पहिल्यापेक्षा वाढल्यामुळे म्हैसूरवर हल्ला करणे संभाजीराजेंना योग्य वाटले नाही.त्यामुळे शत्रूला गुहेतून बाहेर काढून त्याजबरोबर लढावे असा विचार त्यांनी केला.तामीळ प्रांतातील चिक्कदेवराजाच्या ताब्यात असलेल्या त्रिचनापल्लीच्या(सध्याचे त्रिची शहर)पाषाणकोट किल्ल्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.


संभाजीराजेंच्या सोबतीला बसप्पा नाईक हुक्केरी,गोवळकोंड्याचा दिवाण मादण्णा पंडीत तसेच तंजावरच्या एंकोजीरावांच्या सैन्याची कुमक होती.पहाटेच्या सुमारास होडीचा आधार घेत संभाजीराजेंच्या सैन्याने दुथडी भरून वाहणार्‍या कावेरी नदीत घोडी घालून कावेरीचा किनारा गाठला.मराठ्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शहरात अफरातफरी माजली.संभाजीराजेंनी पाषाणकोट किल्ल्यावर जोरदार हल्ला चढविला.गडावरील मदुरेकर नायकाच्या शिबंदीने जोरदार प्रत्युतर दिले.पण शेवटी कवी कलशाच्या नेतुत्वाखालील तिरंदाजांच्या पेटत्या बाणांनी किल्ल्यावरील दारूगोळ्याला आग लागून बुरूज उडाला व शेवटी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.


संभाजीराजेंनी चिक्कदेवराजांकडून मोठी खंडणी वसूल केली.या कालावधीत संभाजीराजेंनी कर्नाटक व तामीळ प्रांतात मोठा मुलूख मारला.या प्रांतातील बावीस किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले.मोठी खंडणी तसेच रसद स्वराज्याला मिळाली.कर्नाटकातील धर्मपुरी-होसूर पासून तामीळ प्रांतातील जिंजी वेलुरापर्यंतचा प्रदेश मराठ्यांच्या घोड्याच्या टापाखाली आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *